बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक दौरा केला असून, या दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील कांदा खरेदीची परिस्थिती आणि साठवलेल्या कांदा चाळींची पाहणी केली आहे.
नाफेडची कांदा खरेदी संशयास्पद असल्याचे दिसत आहे. नाफेडने NCPF च्या 5 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. 18 ते 20 जुलै दरम्यान कांदा खरेदीची शेतकऱ्यांची यादी व्हायरल झाली होती. या यादीमध्ये 6415 शेतकऱ्यांची नावे आहेत, परंतु कांदा खरेदीच्या कॉलममध्ये कोणतीही नोंद नाही. वजन काट्याची माहिती देणाऱ्या कॉलममध्ये ‘डमी’ असे लिहिलेले आहे. यादीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि खरेदी एजन्सीचीही नावे आहेत.