सेल्फी काढत असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यात राहणारी २९ वर्षीय नसरीन कुरेशी तिच्या मैत्रिणींसोबत तोसेघर धबधबा येथे फिरायला गेली होती. पावसामुळे धबधबा बंद असल्याने परतीच्या वाटेवर बोरणे घाटावर थांबून निसर्गाचा आनंद लुटत फोटो काढायला सुरुवात केली. यावेळी नसरीनने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र निसरड्या काठावरुन तिचा पाय घसरला आणि ती 100 फूट खोल दरीत कोसळली.
सुदैवाने ती झाडात अडकल्याने तिचा जीव वाचला. तिच्या मैत्रिणींनी तत्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी होमगार्ड आणि ट्रेकर्सच्या मदतीने तिला बाहेर काढले. या घटनेत नसरीन गंभीर जखमी झाली असून, तिला सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या घटनेने पावसाळ्यात धबधब्यांना भेट देताना काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशा ठिकाणी सुरक्षित अंतर राखणे आणि अनावश्यक धोके टाळणे अत्यंत आवश्यक आहे.