आधार कार्ड वयाचा वैध पुरावा नाही, असा ठोस निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अपघातात मृत व्यक्तीच्या वयानुसार मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठी आधार कार्डचा वयाचा पुरावा म्हणून वापर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या या आदेशाला रद्दबातल ठरवले.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय करोल आणि उज्जल भुयान यांच्या पीठाने सांगितले की, वयाच्या पडताळणीसाठी अधिकृत शाळा प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला अधिक योग्य पुरावा आहे. तसेच, युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) यापूर्वीच आधार कार्ड ओळखीचा पुरावा आहे, जन्मतारखेचा वैध पुरावा नाही, हे स्पष्ट केले आहे.
या निर्णयात न्यायालयाने “किशोर न्याय कायदा, २०१५” मधील कलम ९४ चा हवाला दिला, ज्यात वयाच्या प्रमाणासाठी शाळेच्या दाखल्यावर अधिक भर दिला जातो.